-->

नीतीशतकातील हा श्लोक 'शिखरिणी' या अक्षरगणवृत्तामधे रचलेला आहे

फ्यूचर लाइन टाईम्स 


वरं पक्षच्छेदः समदमघवन्मुक्तकुलिश-
प्रहारैरुद्गच्छद्गहनदहनोद्गारगुरुभि:।
तुषाराद्रे: सूनोरहह पितरिक्लेशनिवशे
न चासौ सम्पातः पयसि पयसां पत्युरुचित:॥२९॥


'नीतीशतक', राजा भर्तृहरी.


वृत्त : शिखरिणी.


राजा भर्तृहरी कृत नीतीशतक 'मानशौर्यपद्धति' विषयविभाग.


अर्थ : एक वेळ क्रुद्ध झालेल्या इंद्राच्या वज्राघातांनी, अतिशय तीव्र दाहक अशा यातना होऊन पंख कापले गेले तरी चालेल.
पण हिमालयासारख्या पर्वतराजाच्या पुत्राने, वडीलांना संकटात सोडून असे भित्रेपणाने समुद्रात लपणे शोभत नाही. हे नीतीला धरून नव्हे.


टीप-
नीतीशतकाच्या काही प्रतींमधे या श्लोकात पाठभेद आढळतात ते असे,
'पक्षच्छेदः' एेवजी 'प्राणच्छेदः' असे आढळते.
तर,
'प्रहारैरुद्गच्छद्गहनदहनोद्गारगुरुभिः' च्या जागी, 'प्रहारैरुद्गच्छद्बहुलदहनोद्गारगुरुभिः' असे लिहिलेले आढळते.
म्हणजे 'प्रहारैः उद्गच्छत् गहन दहनोद्गार' च्या जागी प्रहारैः उद्गच्छत् बहुल दहनोद्गार' असे लिहिलेले आढळते.


पूर्वी पर्वतांना पंख होते, त्यामुळे पर्वत इकडून तिकडे उडून सगळ्या लोकांना (स्वर्ग, पृथ्वी, पाताळ इ. यांना त्रस्त करून सोडत. त्यामुळे रागावलेल्या इंद्राने वज्राचे घाव घालून पर्वतांचे पंख छाटून टाकायला सुरुवात केली. हिमालयाचा पुत्र- मैनाक पर्वत हा आपले पंख कापले जाण्याच्या भीतीने समुद्रात जाऊन लपला अशी अाख्यायिका आहे. 
त्यावेळी संतप्त इन्द्राने फेकलेल्या वज्राच्या प्रचण्ड ज्वालांनी इंद्र व त्याच्या वज्राशी लढतलढत मैनाकाने आपले पंख जाळून घेतले असते तरी बरे झाले असते; पण पित्यावर हिमतुषाराद्री हिमालयावर आलेल्या या प्राणसंकटात भेकडपणे फक्त स्वतःपुरते पाहून उड्डाण करून मैनाकाने, दडण्यासाठी समुद्रात जाऊन पडणे योग्य झाले नाही. साहस लढण्यात दाखवायला हवे होते, उडण्यात वा लपण्यात नाही याबद्दल इथे सांगितलं आहे. त्याने मैनाकाची मानहानीच झाली. 
     मोठ्या लोकांनी धीरोदत्तपणे संकटांचा सामना करायला हवा. असा बोध या श्लोकामधून सांगितला गेला आहे.
वडील कितीही महान असले, तरी मुलगा तसाच वर्तन करेलच असे नाही. असाही एक बोध या श्लोकातून भर्तृहरीला सुवचायचा असावा.
या श्लोकाविषयीचा शास्त्रीय अभ्यास केला तर असेही निदर्शनास येते की प्रचंड आकारातील, पर्वतांसमान भासणार्‍या उल्कांना तर पंख असलेले पर्वत म्हटले गेले नसेल ना? अवकाशीय वस्तूंचे पृथ्वीवर पडणे-उल्कापात, भुरचनाशास्त्राच्या अभ्यासानुसार पृथ्वीवर वेळोवेळी झालेले भूरचनेतील बदल, भूस्खलन, विस्थापन अशा भौगोलिक घटना, समुद्रतऴाशी असलेल्या मोठमोठ्या पर्वतरांगा, इत्यादी दृष्टीकोनातूनही अशा श्लोकांवर अभ्यास व्हयला हवा. 
    बर्‍याच प्राचीन कवींनी लिखाणात सांकेतिक भाषेचा अशाप्रकारे वापर केलेला आढळतो की, सामान्य माणसांची त्यातून करमणूक व्हावी आणि अभ्यासकांनी त्यातून बोध घ्यावेत. याविषयी अनेक जाणकारांनी वेगवेगळया भाषांमधे आपापली मत मांडली आहेत असं गुगल केल्यावर समजलं. इथे विस्तारभयास्तव ते सर्व लिहिणे होत नाही.


तसे पहाता पर्वतांना पंख होते ही कल्पनाच किती जबरदस्त आहे.


नीतीशतकातील हा श्लोक 'शिखरिणी' या अक्षरगणवृत्तामधे रचलेला आहे.
गणक्रम - य म न स भ लगा
लघुदगुरूक्रम - लगागा गागागा ललल ललगा गालल लगा


 


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ